राजकारणातल्या सत्तानाट्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या, पण काहींनी याचा वापर थेट फसवणुकीसाठी केला, असंच काहीसं भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या प्रकरणावरून समोर आलं आहे.
भाजपच्या कामगार आघाडीचा सरचिटणीस म्हणून स्वतःची ओळख देणारा रोहित कैलास कुंदलवाल हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. चौकशीत त्याने धक्कादायक खुलासे केलेत. “सत्तांतराच्या काळात सहाशे कोटींच्या खोक्या माझ्याकडेच होते. मी आठ दिवस ते कंटेनर घेऊन फिरत होतो,” असं तो नागरिकांपुढे मोठ्या आत्मविश्वासाने सांगायचा. या दाव्यामुळे अनेकांनी त्याला मोठा नेता समजून सन्मान दिला, पण आता हे सगळं फसवणूक असल्याचं उघड झालं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित आणि त्याच्या कुटुंबावर नाशिकमधील विविध पोलिस ठाण्यांमध्ये खंडणी, सावकारी, विनयभंग, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे नोंद आहेत. विशेष म्हणजे त्याचे वडील कैलास कुंदलवाल आणि भाऊ निखिल कुंदलवाल हे अद्याप फरार आहेत. पोलिसांची पथकं त्यांचा शोध घेत आहेत.
रोहित याने गेली अनेक वर्षं अवैध सावकारी करत सामान्य नागरिकांना धमकावून पैसे उकळले. महिलांवरही अत्याचाराच्या तक्रारी नोंद आहेत. भद्रकाली पोलिस कोठडीनंतर आता पंचवटी पोलिसांनी त्याच्यावर चौकशी सुरू केली असून पुन्हा न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे.
हा “बड्या बड्या बातों”चा उगम काही साधा नाही. रोहित याने सोशल मीडियावर भाजपचा पदाधिकारी असल्याचे दाखवणारे पोस्ट्स टाकले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतचे फोटोही प्रसारित करत, स्वतःला विशेष राजकीय संबंध असलेला म्हणून लोकांवर प्रभाव टाकायचा प्रयत्न केला. कॉल लॉग्समध्ये मंत्र्यांच्या नावाने नंबर सेव करून “पाहा मी किती वेळ बोलतो मंत्र्यांशी,” असे दाखवत अनेकांना गंडावलं.
त्याने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी जवळीक असल्याचा दावा करून, “तुम्ही माझ्याविरुद्ध तक्रार करू शकत नाही,” असंही लोकांना धमकावलं होतं. मात्र खुद्द आयुक्तांनी हे दावे साफ फेटाळलेत.
सध्या रोहितच्या या थापेबाजीमुळे अनेक पीडित पुढे येत असून, त्याचे वडील व भाऊ पकडले गेल्यानंतर अजून धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.
राजकारण, सावकारी आणि फसवणुकीचा हा सगळा खेळ आता तुरुंगाच्या चार भिंतींच्या आतच खेळला जाणार, एवढं मात्र नक्की!