शासन म्हणजे केवळ राजकारण नाही, तर विकास, नियोजन आणि सामाजिक बदलांची प्रक्रिया! आणि या प्रक्रियेत तरुणांचा थेट सहभाग असावा, हे स्वप्न उराशी बाळगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ ची 2025-26 वर्षासाठीची नवीन आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या विकासप्रक्रियेत तरुणांनी सक्रिय सहभागी व्हावे, प्रशासनाच्या हृदयात जाऊन कामाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, आणि समाजासाठी ठोस योगदान द्यावे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
काय आहे ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’?
ही फेलोशिप म्हणजे केवळ एक नोकरी नाही, तर राज्याच्या विकासप्रक्रियेचा भाग होण्याची संधी आहे. फेलो म्हणून निवड झालेले उमेदवार १२ महिन्यांपर्यंत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेसारख्या प्रशासकीय यंत्रणांमध्ये थेट काम करतील. या काळात त्यांना धोरणांची आखणी, योजना राबविणे, लोकाभिमुख कामकाज, आणि निर्णय प्रक्रियेतील गुंतवणूक याचा जवळून अनुभव घेता येईल.
2025-26 साठी काय विशेष?
• यंदा एकूण 60 फेलोंची निवड करण्यात येणार आहे.
• प्रत्येक फेलोला दरमहा ₹61,500 मानधन (मानधन + प्रवास भत्ता) दिला जाणार आहे.
• IIT मुंबईच्या सहकार्याने सार्वजनिक धोरणावर आधारित पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम देण्यात येणार आहे.
• यासोबत विविध ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण सत्रं, मान्यवरांशी संवाद, फिल्ड व्हिजिट्स, आणि समाजातील प्रत्यक्ष समस्यांवर काम करण्याची संधी मिळणार आहे.
कोण करू शकतो अर्ज?
• कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान 60% गुण)
• किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ अनुभव आवश्यक (नोकरी, इंटर्नशिप, आर्टिकलशिप, स्वयंरोजगार मान्य)
• वय: 21 ते 26 वर्षांच्या दरम्यान
• मराठीसह हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान, तसेच संगणक व इंटरनेटचा मूलभूत वापर आवश्यक
निवड प्रक्रिया कशी असेल?
1. ऑनलाईन अर्ज (शुल्क ₹500)
2. वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा (Online Objective Test)
3. निबंध लेखन (Online)
4. मुंबई येथे मुलाखत
ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्ताधिष्ठित असणार आहे.
सध्या काय स्थिती आहे?
सध्या केवळ कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.
अर्ज भरायच्या तारखा व तपशील लवकरच mahades.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होतील.
या फेलोशिपमुळे काय मिळेल?
• समाजाशी थेट संपर्क
• धोरण निर्मितीत भागीदारी
• प्रशासनात निर्णयप्रक्रियेचा अनुभव
• वैयक्तिक विकास, नेतृत्वगुणांची जोपासना
• करिअरला नवी दिशा
यशाचा शॉर्टकट नाही, पण समाजासाठी काम करताना मिळणारी प्रेरणा, अनुभव आणि समाधान तुम्हाला कुठल्याही कॉर्पोरेट नोकरीत मिळणार नाही.
राज्य बदलवायचंय? तर सुरुवात स्वतःपासून करा.
मुख्यमंत्री फेलोशिप 2025-26 – ही केवळ संधी नाही, ही एक जबाबदारी आहे!